जेव्हापासून संगीतबारी अथवा ढोलकी फडाच्या तमाशातील लावण्या पाहत-ऐकत आलो होतो तेव्हापासून भटक्या-विमुक्त समाजातील महिला कलावंतांचं जीवन आणि कलेतला संघर्ष हा नेहमीच माझ्या क्षेत्रीय संशोधनाचा विषय राहिला. मग तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर असोत, लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर वा सुलोचनाबाई चव्हाण असोत किंवा लावणी-कथ्थक या दोन्हीही नृत्यधारांचा सुरेख संगम घडविणार्या राजश्री नगरकर असोत... त्यांच्या कलेचा पोतही सारखाच आणि जीवनातील संघर्षाचा स्थायीभावही सारखाच.
कलेच्या क्षेत्रात शिखरस्थ असलेल्या महिला कलावंतांच्या कला आणि जीवनसंघर्षाचा आढावा ‘लोकरंगनायिका’ या पुस्तकात घेतला आहे. महाराष्ट्रातील महिला लोककलावंतांसोबत छत्तीसगडच्या तीजनबाई, पश्चिम बंगालच्या पार्वती बाउल, गुजरातच्या धनबाई कारा, उत्तरप्रदेशच्या गुलाबबाई, राजस्थानच्या गुलाबो सपेरा, कर्नाटकच्या मंजम्मा जोगती... या सर्व चाकोरीबाहेरच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी पावलेल्या, मानसन्मान पावलेल्या महिला कलावंतांच्या सुखदु:खांशी एकरूप होता आलं आणि त्याचं प्रतिबिंब ‘लोकरंगनायिका’मध्ये मांडता आलं.
‘कुठल्या गावची वेस ओलांडून आलीस...
राहिलीस माझ्या उजाड रानात पाल ठोकून...’
या मित्राच्या कवितेतील ओळींची पारायणं करीत, हे पुस्तक तुमच्या हाती देत आहे!