• Ghalib:Kavyasameeksha|                ग़ालिब:काव्यसमीक्षा

Ghalib:Kavyasameeksha| ग़ालिब:काव्यसमीक्षा

  • ₹700/-

  • Ex Tax: ₹700/-

गालिबची कविता आस्वादताना एका वेगळ्याच जीवनानुभूतीच्या गर्भगृहात आपण प्रवेश करीत असल्याची जाणीव होते. त्यांच्या वाट्याला आलेला वेदनागर्भ अनुभूतीचा प्रत्यय त्या गर्भगृहात येतो. या काव्याच्या आस्वादनाने चित्तवृत्ती तर प्रफुल्लित होतातच, पण त्याचबरोबर त्यांनी उजळलेल्या जीवनांगाचे रहस्य आपल्याला खुणावू लागते. त्या जीवनरहस्याला आपणही कधीतरी स्पर्श केला होता, पण त्याचे इंगित मात्र आता कळले, अशा अभिज्ञानाला साक्षात्काराचे रूप लाभते. मिर्झांच्या भावसंवेदनेत आपल्या वेदनेचे आकार दिसू लागतात. त्यांच्या अध्यात्मव्याकूळ दर्शनाने आपल्या अंतर्मनातील तत्कुतूहलाच्या तारा झणाणून उठतात. त्यांच्या मृत्युभयात आपल्या अस्तित्वविसर्जनाचे प्रतिबिंब आपल्याला दिसू लागते.

तत्त्वज्ञांनी विशद केलेले समग्र जीवनरूप आणि जीवनविषयक शहाणपण आपल्या मनाला बौद्धिक पातळीवर स्पर्श करीत असतेच, पण गालिबच्या काव्यात प्रकटलेले त्यांचे आंशिक रूप झुळकीसारखे केवळ स्पर्शच करीत नाही, तर आपल्या हृदयात बाणासारखे खचकन् घुसते व सलत राहते, पण त्यामुळेच तत्त्वग्रंथांपेक्षा त्याचे मोल दुणावते. वैचित्र्यपूर्ण अनुभूतींनी विदग्ध झालेली कविवृत्ती शब्दांशी तदाकार झाल्यामुळे त्यांनी म्हटल्याप्रमाणेच साजणाच्या मिठीत फुलून आलेल्या उन्मुक्त, उत्सुक प्रमदेप्रमाणे त्यांच्या शब्दप्रतिमांच्या मिठीत काव्यविषय फुलतात. आपला रूक्ष आकार टाकून अपूर्व सौंदर्याकार धारण करतात.

त्यांच्या या अशा काव्याशयातील न कोमेजणार्‍या चारुतेचे आणि लावण्याचे, सर्वसामान्यपणे आकलनकक्षेत न येणार्‍या त्या विषयविश्वातील सूक्ष्म घटकांचे, त्यांच्यातील परस्परसंबंधाचे, त्यांनी धारण केलेल्या वैचित्र्यपूर्ण रूपाकाराचे आणि विस्तारत जाणार्‍या नित्यनूतन सौंदर्यप्रभेचे डॉ. काळे ह्यांनी घडविलेले दर्शन गालिबच्या काव्यसमीक्षेत मौलिक भर घालणारे आहे. गालिबसमीक्षेच्या निमित्ताने समग्र उर्दू काव्याचा त्यांनी उलगडलेला पट आणि उर्दू काव्यप्रकारांचे केलेले
विवरण - विश्लेषण उर्दू काव्यविभ्रमांचे आकलन अधिक व्यापक आणि समृद्ध करणारे आहे.

ग़ालिब : काव्यसमीक्षा  ।  डॉ. अक्षयकुमार काळे

Write a review

Please login or register to review