‘गॉन विथ द विन्ड’. मार्गारेट मिचेलच्या या अभिजात साहित्यकृतीने प्रसिद्धीनंतर जागतिक खपाचे सगळे उच्चांक मोडले. जगातल्या अनेक भाषांमधून तिचे अनुवाद झाले. गेली सात दशके लक्षावधी वाचकांना तिने अक्षरश: मंत्रमुग्ध केले.
अमेरिकेत एकोणिसाव्या शतकात झालेल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेली ही स्कार्लेट ओ हारा आणि र्हेट बटलर यांची जगावेगळी प्रेम कहाणी आहे.
अमेरिकेच्या दक्षिण प्रांतातले शांत, सुखी जीवन, तिथली घट्ट आणि एकसंध सामाजिक वीण, युद्धाने घडवलेली प्रचंड मोठी आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थित्यंतरे
आणि बदलाच्या वादळाला तोंड देताना हेलपाटलेली, मोडलेली किंवा स्वत्व गमावलेली माणसे - काळाच्या अशा एका विशाल पटावर स्कार्लेट उभी आहे.
स्कार्लेट! आयुष्यावर विलक्षण प्रेम करणारी आणि त्याच्या बदलत्या रूपाला ठाम निर्धाराने सामोरी जाणारी, मनस्वी आणि कणखर स्त्री! तिच्या प्रेमाचा आणि बदलत्या जीवनाचाही स्वीकार करता न येणारा निष्कपट पण दुबळा ऍशले आणि तिला अंतर्बाह्य ओळखून तिच्यावर प्रेम करणारा कर्तबगार र्हेट बटलर!
पूर्णतेचे भाग्य न लाभलेली त्यांची ही प्रेमकहाणी!